गांधी युग (१९२० ते १९४७) | असहकार चळवळ (१९२०) | मुळशी सत्याग्रह (१९२१ ते १९२४) | झेंडा सत्याग्रह

 गांधी युग (१९२० ते १९४७) 

गांधीजींनी 'असहकार' व 'सविनय कायदेभंग' ही तत्त्वे 'थोरो' या पाश्चात्य विचारवंताकडून स्वीकारली. 

चंपारण्य सत्याग्रह : १९१७ साली गांधीजींनी बिहार राज्यातील चंपारण्य येथे भारतातील पहिला सत्याग्रह यशस्वी केला. 

महाराष्ट्रातून चंपारण्य सत्याग्रहात सहभागी झालेले सत्याग्रही : बाबासाहेब सोमण, बबन गोखले, अवंतिकाबाई गोखले, आनंदीबाई वैशंपायन, शंकरराव देव, डॉ. हरिकृष्ण देव, विष्णू सिताराम ऊर्फ आप्पाजी रणदिवे, एकनाथ वासुदेव क्षीरे.

असहकार चळवळ (१९२०) 

सप्टेंबर १९२० च्या कोलकाता येथील विशेष अधिवेशनात असहकार चळवळीचा आराखडा मांडून तो मंजूर करण्यात आला. या अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपतराय होते. २६ डिसेंबर १९२० रोजी नागपूर येथील अधिवेशनात असहकार चळवळीच्या ठरावास काँग्रेसने मान्यता दिली. चक्रवर्ती विजय राघवाचार्य या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 

असहकाराचा कार्यक्रम खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आला होता :

१) परदेशी मालावर बहिष्कार, स्वदेशीचा पुरस्कार. 

२) पदव्या, अधिकारपदे याचा त्याग. 

३) सरकारी सभा, कार्यक्रमांना अनुपस्थिती. 

४) सरकारी शाळांऐवजी राष्ट्रीय शिक्षण संस्थांची स्थापना.

५) सरकारी न्यायालयांवर बहिष्कार टाकून देशी न्याय पंचायतींची स्थापना करावी.

६) कायदेमंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात यावा. 

७) मेसोपोटेमियात पाठविण्यासाठी केल्या जाणाऱ्या लष्करी, मुलकी नोकर भरतीवर बहिष्कार टाकण्यात यावा.

असहकार चळवळ आणि महाराष्ट्र

महाराष्ट्रात असहकार चळवळीस जोरदार पाठिंबा मिळाला. चळवळीतील मूळ ठरावातील उद्दिष्टांनुसार कार्यक्रम राबवण्यात आला. याशिवाय मूळ ठरावात समाविष्ट नसणारा व गांधीजींना प्रिय असणारा 'मद्यपान निषेध चळवळीचा कार्यक्रम देखील महाराष्ट्रात राबवण्यात आला.

असहकार चळवळीतील महाराष्ट्रातील प्रमुख नेते : शिवराम परांजपे, गंगाधर देशपांडे, काकासाहेब खाडीलकर, वासुकाका जोशी, हरिभाऊ फाटक, चिंतामणराव वैद्य (हे सर्व टिळकांचे अनुयायी होते.) याशिवाय अण्णासाहेब भोपटकर, न. चिं. केळकर, बॅरिस्टर एम. आर. जयकर यांनी इच्छेविरुद्ध केवळ काँग्रेसच्या प्रतिष्ठेसाठी असहकारास पाठिंबा दिला.

मद्यपान निषेध कार्यक्रम : असहकार चळवळी दरम्यानचा महाराष्ट्रात सुरू झालेला मद्यपान निषेध कार्यक्रम पुणे, ठाणे, धारवाड, मुंबई येथे आघाडीवर होता. ३० जून १९२० रोजी धारवाड येथे पेंटर या अधिकाऱ्याने जमावावर गोळीबार केला. मद्यपान निषेध आंदोलनादरम्यान ८९ खटले भरून ६० निदर्शकांना दंड झाला. दंडाचे प्रमाण अधिक असल्याने पैशाअभावी ही चळवळ थांबली.

सरकारी न्यायालयांवर बहिष्कार : वासुदेव दास्ताने (भुसावळ), रामचंद्र शंकर राजवाडे (सोलापूर), नानासाहेब देवधेकर (उंबरगाव), साताऱ्याचे अष्टपुत्रे या वकिलांनी नवीन खटले चालविण्यास नकार दिला. • बॅ. जयकर, अण्णासाहेब भोपटकर यांनी न्यायालयातील कामकाज चालू ठेवले.

सरकारी शाळा-महाविद्यालयांवर बहिष्कार : १९२० साली पुण्यात लोकमान्य टिळकांच्या नावे सुरू केलेल्या महाविद्यालयात ८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. शंकरराव जावडेकर (इस्लामपूर), वि. प्र. लिमये (सांगली), बा, चि. लागू (सांगली), सखाराम भागवत (महाड), सदाशिव कान्होजी (मालवण) यांनी सरकारी शाळांवर बहिष्कार टाकून राष्ट्रीय शाळांमधून अध्यापनाचे (शिकविण्याचे) कार्य केले.

परदेशी मालावर बहिष्कार : गांधीजींच्या आवाहनानुसार गिरणीमालकांनी परदेशी कापडाच्या विक्रीस नकार दिला. मध्य प्रांत व व-हाडमध्ये डॉ. चोळकर, बाबासाहेब परांजपे यांनी असहकार चळवळीचे नेतत्व केले. १९२१ मध्ये मुंबईतील अंधेरी येथे बॅ. केशवराव देशपांडे यांनी आनंदीलाल पोतदार यांच्या वाड्यात साधकाश्रम स्थापन केला. या आश्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास सरकारी नोकरी न करण्याची शपथ दिली जात असे.

मुळशी सत्याग्रह (१९२१ ते १९२४) : मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती बापट यांनी केले. पार्श्वभूमी : पुणे जिल्ह्यातील मुळशी येथे मुळा-मुठा नदीवर टाटा कंपनीतर्फे उभारण्यात येणाऱ्या जलविद्युत प्रकल्पामुळे ५४ गावे पाण्याखाली जाणार होती. याविरुद्ध सत्याग्रह पुकारण्यात आला. १६ एप्रिल १९२१ रोजी मुळा नदीपात्रात मुळशी सत्याग्रहास सुरुवात. मुळशी सत्याग्रहातील अन्य नेते : भोपटकर, फाटक, केळकर, शिवरामपंत परांजपे इत्यादी. इ. स. १९२१ ते १९२४ अशी तीन वर्षे मुळशी सत्याग्रह चालला. सेनापती बापट यांना ७ वर्षांची शिक्षा झाली.

झेंडा सत्याग्रह : १९२३ मध्ये नागपूर येथे झेंडा सत्याग्रह मोठ्या प्रमाणात पार पडला. स्त्रीया व लहान मुले यामध्ये आघाडीवर होती.


Post a Comment

0 Comments