भारतीय संविधानाचा सरनामा (उद्देशपत्रिका-PREAMBLE)
- "आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा आणि भारताच्या सर्व नागरिकांस : सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय; विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य: दर्जाची आणि संधीची समानता; निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांची हमी देणारी बंधता प्रवर्धित काय संकल्पपूर्वक निर्धार करून; आमच्या संविधानसभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी यादी संविधान अंगिकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत."
- उद्देशपत्रिका (सरनामा) म्हणजे घटनेचा प्राण किंवा आत्मा होय. ती घटनेची प्रास्ताविका किंवा नांदी आहे. घटनाकारांनी सरनामा ही घटनेची 'गुरुकिल्ली' मानलेली आहे. सरनाम्याद्वारे घटनानिर्मितीमागचा उद्देश स्पष्ट होतो.
- संविधानातील काही अस्पष्ट संधी किंवा उपबंध याचे निरसन करण्यासाठी सरनाम्याचा उपयोग होतो. (उदा. ए. के. गोपालन विरुद्ध मद्रास राज्य खटला, १९५०) व्यक्तीची प्रतिष्ठा कायम ठेवून सामाजिक न्याय आणि सामाजिक उन्नती साधण्यासाठी कोणते मार्ग स्वीकारले पाहिजेत, ह्यांचे आकलन उद्देशपत्रिकेद्वारा स्पष्ट होते.
- २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना परिषदेने सरनामा मंजूर केला, तो पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिला होता.
सरनाम्याचा अर्थ
- या सरनाम्यावरून पुढील तीन गोष्टी स्पष्ट होतात..
अ) घटनेचे उगम स्थान हे भारतीय जनता आहे : याचा अर्थ घटनाकारांनी बनविलेली घटना ही लोकांना मान्य असून भारतीय जनतेनेच ती स्वतःसाठी बनविली आहे असा होतो.
ब) राज्यव्यवस्थेचे स्वरूप :
१) सार्वभौम (Sovereign) : १५ ऑगस्ट १९४७ ते २६ जानेवारी १९५० या काळात स्वतंत्र भारताचे स्थान, हे वसाहतींचे स्वातंत्र्य असे होते, कारण त्यावेळी घटना अंमलात नव्हती. • २६ जानेवारी १९५० रोजी घटनेच्या अंमलबजावणीमुळे भारत हे सार्वभौम राष्ट्र बनले. म्हणजेच, अंतर्गत वा बहिर्गतरित्या भारतावर आता कोणाचेही वर्चस्व राहिलेले नाही.
२) समाजवादी (Socialist) : याचा अर्थ भारताला साम्यवादी अथवा भांडवलशाही अर्थव्यवस्था मान्य नाही. भांडवलदारांपासून श्रमिकांचे शोषण थांबविण्यासाठी उत्पादनाची साधने व वितरणावर सामाजिक मालकी वा नियंत्रण ठेवणारी समाजवादी राज्यव्यवस्था भारताने स्वीकारली आहे.
३) धर्मनिरपेक्ष (Secular) : भारतात धर्म ही व्यक्तीची खाजगी वा ऐच्छिक बाब असून प्रत्येकाला स्वेच्छेनुसार कोणत्याही धर्माचा अवलंब करता येईल, मात्र सार्वजनिक बाबींत धर्माची ढवळाढवळ खपवून घेतली जाणार नाही.
४) लोकशाही (Democratic) : लोकशाही म्हणजे 'लोकानुवर्ती शासन.' म्हणजेच सार्वभौम अशा भारतीय जनतेकडे देशाची अंतिम सत्ता आहे.
५) गणराज्य (Republic) : गणराज्य म्हणजे राजा नसलेले राज्य. गणराज्यात सर्वोच्च शासन प्रमुख हा लोकनियुक्त असतो. भारतीय गणराज्यात सर्वोच्च शासक हा राष्ट्रपती असून तो इंग्लंडच्या राजाप्रमाणे वंशपरंपरागतरित्या पद धारण करत नसतो. त्यांची निवड जनतेद्वारे अप्रत्यक्षपणे होते.
क) राज्यव्यवस्थेचा उद्देश : भारताच्या सर्व नागरिकांना,
१) सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक : न्याय (Justice)
२) विचार, अभिव्यक्ती (उच्चार), श्रद्धा, धर्म व उपासना यांचे : स्वातंत्र्य (Liberty)
३) दर्जा आणि समान संधी याबाबत : समानता (Equality)
४) व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता (Unity) व एकात्मता (अखंडता -Integrity) राखणारी : बंधूता (Fraternity) मिळवून देणे हा भारतीय राज्यघटनेचा उद्देश आहे.
0 Comments