डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पश्चात महाराष्ट्रातील दलित चळवळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर महाराष्ट्रातील दलित चळवळ पुढे नेणाऱ्या नेत्यांमध्ये सर्वश्री दादासाहेब गायकवाड, रा. सु. गवई, सी. एन. शिवराज, जी. टी. मेश्राम आदींचा समावेश होतो.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया :
३ नोव्हेंबर १९५७ रोजी सी. एन. शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन हा पक्ष बरखास्त करून त्याऐवजी 'अखिल भारत रिपब्लिकन पक्ष' (RPI) स्थापन केला. या पक्षाच्या वतीने दादासाहेब गायकवाड यांनी भूमिहिनांचा सत्याग्रह घडवून आणला व दलित आणि भूमिहिनांना जमिनी मिळवून दिल्या.
दलित पँथर पक्षाची स्थापना :
९ जलै १९७२ रोजी रिपब्लिकन पक्षातील गटबाजीमुळे नव्या पिढीतील आंबेडकरवादी विचारांच्या तरुणांनी दलित पँथर या लढाऊ संघटनेची स्थापना केली. नामदेव ढसाळ, रामदास आठवले, राजा ढाले, अरुण कांबळे इत्यादी नेत्यांचा या पक्षाच्या स्थापनेत पुढाकार होता.
'दलित तरुणांमध्ये चैतन्य व सामर्थ्य जागृत करणारी चळवळ' असे दलित पँथरचे कौतुक झाले. दलित पँथरचे सरचिटणीस गंगाधर गाडे यांनी ७ जुलै १९७७ रोजी सर्वप्रथम औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठास 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली.
१३ जानेवारी १९९४ रोजी तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांनी नामविस्तारास मंजुरी दिली. १४ जानेवारी १९९४ रोजी तत्कालिन राज्यपालांनी वटहुकुमाद्वारे 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' अशी नामविस्ताराची घोषणा केली. सारांश, दलित पँथर संघटनेने नेहमीच एक राजकीय, सामाजिक दबाव गट म्हणून कार्य केले.
दलित साहित्य चळवळ :
दलित चळवळीच्या वैचारिक जडणघडणीत दलित साहित्य चळवळीने मोठे योगदान दिले. अण्णाभाऊ साठे, शंकरराव खरात, बाबूराव बागूल, केशव मेश्राम इत्यादी साहित्यिकांनी दलित साहित्यामध्ये बंडखोरी व विद्रोह असा आधुनिक प्रवाह निर्माण केला. अण्णाभाऊ साठे हे दलित समाजातील पहिले लेखक. त्यांची ‘फकिरा' ही सर्वोत्कृष्ट कादंबरी, तर ‘स्मशानातील सोने' ही सर्वोत्तम कथा.
बाबूराव बागूल यांच्या 'जेव्हा मी जात चोरली होती' या विद्रोही कथासंग्रहाने महाराष्ट्रातील दलित साहित्य चळवळीत बंडखोरी व विद्रोहाचा सर्वप्रथम पुरस्कार केला होता. सारांश, दलित चळवळीने समाजात क्रांतिकारक परिवर्तन करताना दलितांना स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधूता या मानवी मूल्यांची प्राप्ती करून दिली.
0 Comments