महाराष्ट्रातील १८५७ चा उठाव | कोल्हापुरातील उठाव | साताऱ्यातील उठाव | नाशिकच्या पेठमधील उठाव | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उठाव

 महाराष्ट्रातील १८५७ चा उठाव 

१८५७ चा उठाव
१८५७ चा उठाव


  • १८५७ च्या उठावाचे लोण प्रामुख्याने उत्तर भारतातच सर्वाधिक पसरले. दक्षिण भारत उठावापासून बऱ्यापैकी वंचित राहिला. महाराष्ट्रातील ज्या काही ठिकाणी १८५७ च्या उठावाचे पडसाद उमटले त्याचा थोडक्यात आढावा  

कोल्हापुरातील उठाव : 

  • ३१ जुलै १८५७ रोजी सैन्याच्या २७ व्या रेजिमेन्टमधील भारतीय सैनिकांनी उठाव करताना रेजिमेंटची तिजोरी लुटली. २१ व्या व २८ व्या तुकडीतील सैनिकांनी त्यांना मदत केली. जेकब' या ब्रिटिश अधिकाऱ्याने हा उठाव मोडून काढला. 
  • ६ डिसेंबर १८५७ रोजी कोल्हापूर, बेळगाव, धारवाड येथील भारतीय सैनिकांनी उठावाचा प्रयत्न केला. मात्र तो वेळीच दडपून टाकण्यात आला. १५ डिसेंबर १८५७ रोजी चिमासाहेब यांनी बंडाचा प्रयत्न केला. 

साताऱ्यातील उठाव : 

  • साताऱ्याचे राजे छत्रपती प्रतापसिंह यांचे खालसा झालेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगो बापूजींनी इंग्लंडला जाऊन प्रयत्न केले. त्यास यश न आल्याने रंगो बापूजींनी १८५७ च्या उठावात भाग घेतला. 
  • रंगो बापूजी यांनी कोल्हापूर, पंढरपूर, फलटण, वाठार, कराड, कळंबी, बेळगाव, आरळे, देऊरे इत्यादी ठिकाणे उठावासाठी निश्चित केली.
  • भोरपासून बेळगावपर्यंत रामोशी, कोळी, मांग या समाजातील लोकांना एकत्रित केले. ब्रिटिशांनी हा उठाव तात्काळ मोडीत काढला. भोर येथील पतसचिवाचे नोकर कृष्णाजी सदाशिव सिंदकर यांनी रंगो बापंना फितरीने ब्रिटिशांच्या हवाली केले. ब्रिटिशांनी कृष्णाजींना ‘विश्वासराव' हा किताब दिला. 

नाशिकच्या पेठमधील उठाव : 

  • नाशिक जिल्ह्यातील पेठ येथील राजा भगवतराव निळकंठराव यांच्या नेतृत्वाखाली कोळी बांधवांनी उठाव केला. ६ डिसेंबर १८५७ रोजी हटूलच्या बाजारात भिल्लांच्या मदतीने उठाव झाला . ग्लासपल' या ब्रिटिश अधिकाऱ्याने हे बंड मोडून काढताना पेठच्या राजास फाशी दिली.
  • जानेवारी १८५७ मध्ये नांदगाव येथे भिल्लांनी केलेला उठवाचा प्रयत्न मोडून काढला गेला. 

नागपूरमधील उठाव : 

  • नागपूरच्या उठाववाल्यांना लखनौ, कानपूर येथील बंडखोरांची साथ होती. १३ जून १८५७ रोजी सीताबर्डी, कामठी याठिकाणी उठावाचा आखलेला बेत इंग्रजांनी आधीच मोडून काढला. यावेळी नागपूरची राणी बांकाबाई इंग्रजांशी एकनिष्ठ राहिली. 

औरंगाबादमधील उठाव : 

  • येथील घोडदळातील मुस्लीम समाजातील शिपायांच्या उठावाचा प्रयत्न ब्रिटिशांनी मोडन काला जमखिंडी संस्थानचे राजे आप्पासाहेब पटवर्धन हे इंग्रजांच्या मर्जीतील असल्यामुळे तेथील उठाव फसला. मुधोळमधील हलगडी येथील बेरड समाजाने केलेला उठावाचा प्रयत्न अयशस्वी ठरला. 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उठाव : 

  • लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी मुंबई प्रांतात रयतवारी पद्धत लागू केल्यामुळे जमीन महसूलाची जबाबदारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडे गेली. शेतसारा भरण्यासाठी अनेकांना जमिनी विकाव्या लागल्या. परिणामी, पुणे, सातारा, सोलापूर भागात शेतकऱ्यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केले. 
  • १८७४ साली पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील 'कर्धे' या गावाच्या शेतकऱ्यांनी सारा भरण्याचे नाकारले. 
  • १२ मे १८७५ रोजी 'सुपे' येथे शेतकऱ्यांनी पहिला मोठा उठाव करून मारवाडी, गुजर, सावकार यांच्यावर हल्ले केले. 
  • अहमदनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सावकारांची मालमत्ता लुटली. पुणे, सातारा, रायगड, सोलापूर, रत्नागिरी जिल्ह्यात हे लोण पसरले. इंदापूर, भिमडी, कर्जत, शिरूर, हवेली, पारनेर, श्रीगोंदा ही शेतकरी उठावाची केंद्रे होती. 
  • शेतकऱ्यांच्या असंतोषाची चौकशी करण्यासाठी सरकारने चार सदस्यांचे 'डेक्कन रॉयटस् कमिशन' नेमले. या कमिशनच्या शिफारशींनुसार १८७९ मध्ये सरकारने 'दि डेक्कन ॲग्रिकल्चरल रिलिफ अॅक्ट' संमत केला. 
या कायद्यातील तरतुदी :
  • १) शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी 'तगाई कर्जे' पुरविण्यात यावीत.  
  • २) शेतकरी बँका सुरू करण्यात याव्यात. 
  • ३) कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांकडे हस्तांतरीत होऊ देऊ नयेत. 
  • या तरतुदींमुळे शेतकऱ्यांमधील असंतोष कमी होण्यास मदत झाली.


Post a Comment

0 Comments