१८५७ चा राष्ट्रीय उठाव आणि महाराष्ट्र
![]() |
१८५७ चा उठाव |
१८५७ च्या उठावापूर्वी महाराष्ट्रात पहिला मोठा संघर्ष ब्रिटिश सरकार व रामोशी यांच्यात झाला होता. महाराष्ट्रातील संस्थानिकांनी रामोशी, कोळी, भिल्ल यांना उठाव करण्यास प्रोत्साहन दिले होते.
महाराष्ट्रातील रामोशी समाजाचे उठाव
प्रामुख्याने महाराष्ट्रात राहणारे रामोशी (रामवंशी) बांधव 'नाईक' अशी संज्ञा लावत. रामोशी या शब्दाचा अर्थ 'रानवंशी' म्हणजे रानात राहणारे असाही घेतला जातो. रामोशी बांधव पशुपालन, किल्ल्यांचा बंदोबस्त, तसेच काही गावांचा महसूल गोळी करीत असत. त्यांना वतनी इनामेही देण्यात आली होती. ब्रिटिशांनी रामोशांची इनामे जप्त करतानाच कामावरूनही कमी केले. त्यामुळे त्यांनी उठाव केले. उमाजी नाईक यांनी रामोशांच्या बंडाचे नेतृत्व केले.
नरवीर उमाजी नाईक यांचा उठाव
- उमाजी दादजी नाईक (खोमणे). जन्म : ७ सप्टेंबर १७९१; भिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे येथे.
- नरवीर उमाजी नाईक पुरंदर किल्ल्याच्या बंदोबस्तात होते. प्रा. सदाशिव आठवले यांनी उमाजी नाईक यांचे '१६२ सेमी उंचीचा, मोठ्या डोळ्यांचा उमाजी क्रूर नव्हता, त्याचा चेहरा सौम्य व प्रसन्न होता.' या शब्दांत वर्णन केले आहे.
- टीप : वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक गणले जाते. मात्र, फडके यांच्याआधी सुमारे ६० वर्षे नरवीर उमाजी नाईक यांनी ब्रिटिशांविरुद्ध क्रांतीचे हत्यार उपसले. त्यामुळे उमाजी नाईक यांचा उल्लेखदेखील 'आद्य क्रांतिकारक असा केला जातो.
- ब्रिटिशांनी रामोशी वतने रद्द केल्याच्या रागातून उमाजींनी सहकाऱ्यांच्या साथीने दरोडे घालण्यास सुरुवात केली.
- उमाजी नाईक यांच्या आधी संतू नाईक यांनी रामोशी समाजाचे नेतृत्व केले.
- १८१८ मध्ये भोर जवळील 'विंग' गावात दरोडा टाकताना ब्रिटिशांनी उमाजींना पकडले.
- तुरुंगातच त्यांनी अक्षर ओळख करून घेतली. १८२४ च्या दरम्यान संतू नाईकांच्या नेतृत्वाखाली उमाजी व अमृता नाईक या बंधूंनी भांबुडाचा लष्करी खजिना लुटला.
- संतू नाईक यांच्या निधनानंतर उमाजी नाईक हे रामोशींचे नेते बनले. पुढारी बनताच उमाजींनी ७ दरोडे व ८ वाटमाऱ्या करून ब्रिटिशांना जेरीस आणले. जेजुरी, सासवड, परिचे, भिवरी, किकवी या भागात त्यांनी प्रचंड लूट केली.
- गोरगरिबांना या लुटीतील माल त्यांनी दान केला. उमाजी स्वतःला ‘राजे' असे म्हणवून घेत असत. १८२६ मध्ये ब्रिटिशांनी पहिला जाहीरनामा काढून उमाजी व त्यांचा साथीदार पांडूजी यांना पकडून देणाऱ्यास १०० रुपयांचे बक्षिस जाहीर केले. उमाजींना पकडण्यासाठी घोडदळ तयार केले, चौक्या बसविल्या.
- दुसऱ्या जाहीरनाम्यानुसार ब्रिटिशांनी दरोडेखोरांना साथ देणाऱ्यांना मृत्यूदंड देण्यात येईल, असे जाहीर केले.
- तिसऱ्या जाहीरनाम्यानुसार उमाजींना पकडून देणाऱ्यास १२०० रुपयांचे बक्षिस जाहीर केले. मात्र जनतेने व प्रतिष्ठित व्यक्तींनी साथ दिल्याने उमाजींना सरकारची प्रत्येक हालचाल कळत होती.
- ३० नोव्हेंबर १८२७ रोजी ब्रिटिशांना आव्हान देताना उमाजींनी पुण्याचे कलेक्टर एच. डी. रॉबर्टसन यांच्याकडे रामोशांची परंपरागत वतने परत करावीत, तसेच पुरंदर व अन्य ठिकाणच्या रामोशी वतनांना इंग्रजांनी हात लाव नये. अमृता रामोशी व विनोबा यांना सोडण्यात यावे अशा मागण्या केल्या.
- हा प्रस्ताव नाकारताना रॉबर्टसन यांनी १८२७ मध्ये उमाजी, भूजाजी, पांडुजी, येसाजी यांना पकडून देणाऱ्यास प्रत्येकी ५००० रुपये बक्षीस घोषित केले, परंतु उमाजींवर याचा परिणाम झाला नाही.
- कोल्हापूरचे छत्रपती व आंग्रे यांच्याशी उमाजींनी संधान बांधले.
- भोर संस्थानातील १३ गावांनी उमाजींना महसूल दिला.
- उमाजींच्या बायको-मुलांना कैद केल्यामुळे त्यांनी शरणागती पत्करली. इंग्रजांनी त्यांचे सर्व गुन्हे माफ करून पुणे व सातारा भागात शांतता टिकविण्याची जबाबदारी दिली. मात्र १३ गावांच्या महसूलावरून वाद.
- खटाव, नातेपुते येथे उमाजींनी बंडाची तयारी केल्याने त्यांना अटक. उमाजींनी तुरुंगातून पळ काढला.
- कॅ. अलेक्झांडर व कॅ. मॅकिन्टॉश यांनी उमाजींना पकडण्याची जबाबदारी घेतली, परंतु ते हाती लागले नाहीत.
- जानेवारी १८३१ मध्ये पुण्याचे जॉर्ज जिबर्न यांनी उमाजी व त्यांच्या साथीदारांना पकडून देणाऱ्यास ५००० रु. व २०० बिघा जमीन तर उमाजींची माहिती देणाऱ्यास २५०० रु. व १०० बिघे जमीन देण्याची घोषणा केली.
- ८ ऑगस्ट १८३१ रोजी ब्रिटिशांनी घोषित केलेल्या १०,००० रु. व २०० बिघा जमीन या मोठ्या आमिषास बळी पडून उमाजींचे सहकारी काळू नाईक, नाना चव्हाण आणि बापूसिंग परदेशी यांनी फितुरी केली.
- १५ डिसेंबर १८३१ रोजी नाना चव्हाण याने उत्तोळी (उत्तरोली) येथे उमाजींना पकडून इंग्रजांच्या हवाली केले.
- ३ फेब्रुवारी १८३२ रोजी नरवीर उमाजी नाईक यांना पुण्यातील खडकमाळ आळी येथे फाशी देण्यात आली. उमाजींसोबत त्यांचे साथीदार खुशाबा नाईक आणि बापू सोळकर यांनादेखील ब्रिटिशांनी फाशी दिली.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
१८५७ च्या उठावाची कारणे । राजकीय कारणे । सामाजिक कारणे । धार्मिक कारणे । आर्थिक कारणे । लष्करी कारणे
0 Comments